दिवसभर वाहतूक बंद : नगरपालिकेकडून खबरदारी
निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडलगत असणारे जुनाट झाड नगरपालिका प्रशासनाकडून हटविण्यात आले. झाड हटविण्याच्या कामामुळे जुना पी. बी. रोड ते राणी चन्नम्मा सर्कल या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली. झाड जुन्या काळातील असल्याने आणि ते वाहनधारकांसह सार्वजनिकांना धोकादायक ठरत असल्याने हटविण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जुन्या पी. बी. रोडलगत राणी चन्नम्मा सर्कलकडे जाताना वैयक्तिक मालकीच्या इमारतीलगत हे झाड होते. वर्षानुवर्षे वाढत गेल्याने सध्या ते इमारतीसह आजूबाजूला धोकादायकवाटत होते. झाडाचा काही भाग इमारतीत शिरला होता. शिवाय वाकून ते प्रमुख मार्गावर आले होते. काही दिवसांपूर्वी झाडाचा काही भाग मोडला होता, पुन्हा झाडाच्या फांद्या तूटून त्या वाहनधारक, नागरिकांना त्रासदायक ठरत होत्या. जुना पी. बी. रोड ते राणी चन्नम्मा सर्कल हा शहरातील प्रमुख मार्ग असून येथे लहान- मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते.
शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने आणि झाड कधी खाली कोसळेल? हे सांगता येत नसल्याने पालिकेने हे झाड हटविले. यामुळे जुन्या पी. बी. रोडवर बॅरिकेट्स उभारून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रस्ता बंद केल्याने पर्यायी मार्गाने वाहनधारकांना जावे लागत होते.
Belgaum Varta Belgaum Varta