
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : भाविकांमधून उत्साहाचे वातावरण
निपाणी (वार्ता) : दरवर्षीच श्रावण महिन्यात शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्याकरता भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी (ता.२१) शिवमंदिरे भाविकांनी फुलल्याचे चित्र दिसून आले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात मंदिरासह इतर मंदिरात ‘हर हर महादेव’चा गजर दिवसभर सुरू होता.
गेल्या ३ वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रार्थना स्थळावर निर्बंध होते. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आले नाही. गतवर्षी बहुतांश भाविकांना देवस्थान बंद असल्याने मंदिराच्या द्वारा समोरूनच दर्शन घेऊन समाधान मानावे लागले होते.
येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात पूजा नितीन गुरव, सचिन सुतार, किरण भालेभालदार व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बांधली होती.
श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार दांपत्य आणि भाविकांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. मल्लिकार्जुन गडकरी, गणेश खडेद आणि ऋतिक शेटके परिवारातर्फे प्रसादाचे वाटप झाले. यावर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरात शंकराच्या फिरत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. याशिवाय विविध प्रकारच्या फुलांनी नागदेवतांची सजावट केली होती. तर मंदिरात १४ ज्योतिर्लिंग चित्र प्रदर्शन माऔण्यात आले होते.रात्री पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी माजी सभापती सुनील पाटील, अनिल पाटील, अमर बागेवाडी, चंद्रकांत तारळे, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, सदानंद दुमाले, इराण्णा शिरगावे, महादेव पाटील, बाबासाहेब साजनावर, रवींद्र चंद्रकुडे,संजय मोळवाडे, समीर बागेवाडी, रोहित पाटील यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते व नीलंबिका महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
यासह शहर आणि ग्रामीण भागातील विविध महादेव मंदिर, आडी येथील मल्लिकार्जुन मंदिर, शिप्पूर येथील रामलिंग मंदिर, मंगळवार पेठेतील महादेव मंदिर या ठिकाणी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वच मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
——————————————————————-
तिसऱ्या सोमवारी विविध ठिकाणी यात्रा
यंदा १७ ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होऊन १५ सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना आहे. या दरम्यान २१ ऑगस्ट पहिला सोमवार, २८ ऑगस्ट दुसरा सोमवार, ४ सप्टेंबरला तिसरा सोमवार आणि ११ सप्टेंबरला चौथा सोमवार अशा चार सोमवारी शिवमंदिरे शिवभक्तांनी फुलून जाणार आहेत. तर तिसऱ्या सोमवारी आडी मल्लय्या डोंगर, शिप्पुर रामलिंग मंदिर व विविध मंदिर परिसरात यात्रा भरणार आहेत.
——————————————————————-
व्यवसायिकामध्ये उत्साह
तीन वर्षाच्या कोरोना नंतर मंदिर परिसरातील व्यवसायिकांची पहिल्या श्रावण सोमवारी आर्थिक उलाढालही चांगली झाली. मंदिर परिसरात बेल, नारळ, फूल, पूजा साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
Belgaum Varta Belgaum Varta