कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के; देवचंद महाविद्यालयात मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (एनइपी) स्वरूप पाहिल्यास भविष्यात स्वायत्तता येण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञान कौशल्यपूर्वक वापरून विद्यार्थ्यांना सतत कार्यमग्न ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आहे. शिक्षण संस्थांनी ते समजून घेऊनप्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह होते.
प्रथम कुलगुरू डॉ. शिर्के यांचे महाविद्यालयाकडून स्वागत झाले. प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. सी. एम. नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
रोहन पावले हा विद्यार्थी दक्षिण कोरिया येथे संशोधक म्हणून जात असल्याने त्याचा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सत्कार केला. डॉ. पी. वाय. पाटील यांनी बनविलेल्या संख्याशास्त्र प्रात्यक्षिक कार्यपुस्तिकेचे अनावरण झाले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनीमहाविद्यालयातील ग्रंथालय आणि संशोधन विभागास भेट देऊन पाहणी केली.
कार्यक्रमास डॉ. तृप्ती शाह, खजिनदार सुबोध शाह, संचालक प्रकाश शाह, प्रल्हाद पाटील, प्रदीप मोकाशी, प्रदीप शाह व मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुजाता पाटील, डॉ. अनिता चिखलीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. पी. पी. शाह यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta