आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगाव येथे मुकुटसप्तमी कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : मानव जातीच्या कल्याणासाठी जैन मुनीनी मोठा त्याग केला आहे. जैन धर्मात अहिंसा व त्याग याला विशेष असे महत्त्व आहे. पाच महिने चालणाऱ्या या चातुर्मास काळात प्राणी पक्ष्यांची हिंसा टाळून लोककल्याणासाठी विविध विधिवत पूजा व शिबिराचे आयोजन करून जैन धर्माचे पवित्रता जपले जाते. समाधीसम्राट शांतीसागर मुनी महाराजांचा आदर्श,त्यांनी घालून दिलेल्या आचार विचार व दिगंबर परंपरेनुसार जैन मुनि आत्मकल्याण व लोककल्याणासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे भगवान पार्श्वनाथ मोक्ष कल्याणक दिवस म्हणजे मुकुटसप्तमीचे औचित्य साधून सर्वोदय पावनवर्षा योगाचे ध्वजारोहण मंडप उद्घाटन व प्रति सम्मेद शिखरजीच्या उभारण्यात आलेल्या प्रतिमेचे पूजन आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात करण्यात आले. त्याप्रसंगी मुनी महाराज बोलत होते.
प्रारंभी धर्मानुरागी आण्णासाहेब हवले दाम्पत्यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण, नगरसेवक धर्मानुरागी शरद जंगटे यांच्या हस्ते सभा मंडपाचे, भरत पाटील यांच्या हस्ते प्रति शिखरजीचे पूजन करण्यात आले.
आचार्य श्री कुलरत्न भूषण महाराज म्हणाले,जैन धर्मात जन्म झाल्याचे सार्थक होण्यासाठी प्रत्येकाने सम्मेद शिखरजीचे दर्शन घेतले पाहिजे. या धर्मात पवित्रता, श्रेष्ठता, प्रामाणिकता व दिगंबर जैन मुनिंचे त्याग, तसेच साहित्य, कला, धर्म परंपरा, संस्कृती, सभ्यता, पवित्र तीर्थक्षेत्रे पहावयास मिळतात.
यावेळी भगवान श्री १००८ पार्श्वनाथांचे मोक्ष कल्याण मुकुट सप्तमी दिवशी ध्वजारोहन, भगवज्जीनाभिषेक, सम्मेद शिखरजी पूजा, आचार्यश्रींचे आहारचर्या, भगवान पार्श्वनाथांचे ऐतिहासिक संगीतमय पुजाष्ठक,निर्वाणकल्याण मुकुट सप्तमी पूजा करण्यात आली. कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी, बसव ज्योती युथ फौंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अधिक्षक हामसिध्द गोंधळे, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जोल्ले, अनुज हवले, सुनीता हवले, पवन पाटील, राकेश जैन, राजेश जैन यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta