ग्रामस्थातर्फे शोकसभा; गावात वाचनालय सुरू करण्याचा मानस
निपाणी (वार्ता) : बुदलमुख गावच्या हितासाठी, विकासासाठी कष्ट घेतलेल्या शामराव जाधव यांच्या निधनाने पंचक्रोशीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने गावात वाचनालय सुरू करून किंवा त्यांच्या नावे साहित्यिक पुरस्कार योजना राबवल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार बुदलमुख येथे आयोजित शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी रमेश देसाई यांनी, शामराव जाधव यांनी गावच्या हितासाठी तळमळीने काम केल्याचे आपण नेहमीच पाहिले आहे. त्यांच्या नावाने गावात वाचनालय झाल्यास गावातील मुलांमध्ये वाचनाची आवड रूजेल आणि त्यांचे चिरंतन स्मारकही होईल.
संजय कांबळे म्हणाले, शामराव जाधव यांच्या अप्रकाशित कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याचा मानस अंकुर कवी मंडळाच्या सदस्यांचा आहे.
उमेश शिरगुप्पे म्हणाले, शामराव जाधव यांच्या नावे काव्यसंग्रहाला दरवर्षी पुरस्कार देण्याची योजना राबवल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वाचनालयही चिरंतन स्मारक ठरेल.
प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी, बुदलमुख गावातील शामराव जाधव आणि श्रीनिवास दीक्षित या दोन माणसांनी आपले जीवन समृद्ध केले. शामण्णांमुळे आपली साहित्यिक जडणघडणच नव्हे तर आपल्या जीवनाला दिशा मिळाली. श्रीनिवास दीक्षित यांच्यामुळे कोल्हापुरात आपल्याला उमेदीच्या काळात आसरा आणि संधी लाभली. शामराव जाधव यांचे गावासाठीचे योगदान लक्षात घेता गावात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी ठोस कृतीची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी सुनील कांबळे, प्रा. आनंद संकपाळ, राजू सुर्यवंशी, बाबू माने, धोंडीराम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दत्ता कुंभार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta