हरिनाम सप्ताहाचे आयोजन; रनखांब खुला केल्याने भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गोवा आणि कोकण अशा भागातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळक्षेत्र मेतगे (ता. कागल) येथे श्री सद्गुरु बाळूमामांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त सोमवार( ता. २८ ऑगस्ट) ते सोमवार (ता.४ सप्टेंबर) अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्री सद्गुरु बाळूमामा ग्रंथाचे वाचन, प्रवचन, कीर्तन आयोजित केले आहेत. दररोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरी नामाचा गजर, सायंकाळी प्रवचन रात्री कीर्तन व त्यानंतर भजन होणार आहे. तसेच दुपारी एक ते चार दरम्यान दररोज महिलांसाठी भजनाची वेळ राखून ठेवण्यात आली आहे.
हरिनाम सप्ताहामध्ये मारुती लवटे- हणबरवाडी, नामदेव पाटील – कसबा आरळे, नवनाथ घाटगे -यरनाळ, बळीराम तांबेकर – जैन्याळ, तुकाराम देसाई – हरळी खुर्द, वाल्मीक डवरी – सोनवडे, शशिकांत गुरव – चौंडाळ यांचे प्रवचन व किर्तन होणार आहे. याशिवाय रविवारी( ता. ३) श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. श्री सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट व श्री सद्गुरु बाळूमामा उत्सव कमिटी, ग्रामस्थ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते हा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करतात. यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान येथे भक्तांच्यासाठी स्वतः बाळूमामांनी रोवलेला रनखांब दर्शनासाठी खुला केल्याने मोठी गर्दी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta