
ब्राझिलमध्ये सप्टेंबरमध्ये रंगणार विश्व नेमबाज स्पर्धा : बेळगाव जिल्ह्यातून एकमेव निवड
निपाणी (वार्ता) : मनात जिद्द आणि आत्मविश्वास आणि सहकार्य करणारे हात सोबत असतील तर त्याच्या जोरावर आपले ध्येय गाठू शकतो. कितीही जबाबदारी आणि काम असले तर त्यातूनही वेळ काढून आपले ध्येय गाठण्यासाठी माणूस प्रयत्न करीत असतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे, भारतीय सैन्यात कार्यरत असताना नेमबाजीत आवड असल्याने प्रयत्नाच्या जोरावर नाईग्लज (ता. चिकोडी) येथील केदारलिंग बाळकृष्ण उचगावे याने नेमबाजीत उज्ज्वल यश मिळविले आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये ब्राझिलमध्ये होणाऱ्या आयएसएसएफच्या २०२३ सालातील विश्व नेमबाज चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
चिकोडी तालुक्यातील नाईंग्लज येथील केदारलिंग बाळकृष्ण उचगावे हा गरीब कुटुंबात जन्माला आला. सन २०१८ मध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जिद्दीच्या जोरावर सैन्य भरतीसाठी प्रयत्न केले आणि पहिल्याच फेरीत यश मिळवित
देशसेवेत रुजू झाला. त्याला देशसेवेबरोबर नेमबाजीची आवड होती. सैन्य भरतीत गेल्यावरही तो नेमबाजीत नेहमीच अग्रेसर राहिला. त्यातूनच तो सैन्य तळावर रोज नेमबाजीचा सराव करीत आहे. यापूर्वी केदारलिंगने दोनवेळा नेमबाजीत यश मिळवून देशाला पदक मिळवून दिले आहे.
केदारलिंग याने आपले प्राथमिक शिक्षण कन्नड शाळा-नाईग्लज येथे पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण सरकारी माध्यमिक शाळा नवलिहाळ येथे पूर्ण करून बारावीपर्यंतचे शिक्षण एस. बी. मगदूम महाविद्यालय- चिकोडी येथे पूर्ण केले. सध्या तो इंदोरमध्ये (मध्यप्रदेश) मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. दरम्यान जूनमध्ये नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया रँकिंग नेमबाजीमध्ये सातव्या रँकने तो उत्तीर्ण झाला.त्याची दखल घेत येत्या सप्टेंबरमध्ये १२ ते १९ अखेर ब्राझीलमधील रिओ शहरात होणाऱ्या विश्व नेमबाज स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातून १८ खेळाडूंची निवड झाली असून त्यामध्ये केदारलिंग उचगावे हा बेळगाव जिल्ह्यातला एकमेव खेळाडू आहे. या त्याच्या यशामुळे नाईंग्लज बरोबरच बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्वांचे लक्ष सदर स्पर्धेकडे लागून राहिले असून सर्वत्र केदारलिंग व त्याचे वडील बाळकृष्ण यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta