युवकांचे प्रमाण लक्षणीय; नैराश्याची भावना कारणीभूत
निपाणी (वार्ता) : तारुण्याची अवस्था म्हणजे प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती व प्रगतीच्या दिशेने धडपडणारी दमदार पावले समजली जातात, मात्र अलीकडे अनेक युवक शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणांनीनिराशेच्या गर्तेत सापडून आत्महत्येसारखे निर्णय घेत आहेत.
निपाणी तालुक्यात वर्षभरात २५ जणांनी आत्महत्या केली आहे. त्यात युवकांचे प्रमाणही मोठे असल्याने पालकांसह समाजमन अस्वस्थ आहे. त्याला युवकांचे नैराश्यच कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बहुतांश युवकांचे भावविश्व प्रेम, शिक्षण, नोकरी, पैसा कमविणे या भोवतीच फिरणारे आहे. यापैकी एखादी गोष्ट साध्य झाली नाही तर निराशेचा गुंता सुरू होतो. सर्वच पालकांना मुलगा शाळा- महाविद्यालयांमध्ये फर्स्टक्लास, डिस्टिंक्शनसह उद्योग, व्यवसाय, नोकरीत पुढे असावा, अशीच अपेक्षा असते. त्यादडपणाखाली मुले वावरतात. अपेक्षित यश न मिळाल्याने आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलत आहेत. दहावी-बारावी व स्पर्धा परीक्षेत नापास होण्याच्या भीतीनेच निपाणी भागात युवकांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे खरंच दहावी-बारावी अशा परीक्षा जिवापेक्षा मोठे आहेत का, हा प्रश्न समाजमनाला अंतर्मुख करणारा आहे.
——————————————————————
‘पालकांनी मुलांना आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. विद्यार्थ्यांनीही अभ्यासाचे वर्षभराचे नियोजन केल्यास परीक्षेवेळी ताण वाढत नाही. अपयशाने खचून न जाता चुकीचे पाऊल उचलण्याआधी विद्यार्थ्यांनी कौटुंबीक परिस्थितीचे भान ठेवून भविष्याचा विचार करावा. याशिवाय कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी सर्वांना समुपदेशनाची गरज आहे.’
– प्रा. नानासाहेब जामदार,
देवचंद कॉलेज, अर्जुननगर
——————————————————————
‘अनेकजण वैयक्तिक कारणातून आत्महत्या करत आहेत. त्यात तरुणांची संख्या वाढती आहे. अशा घटना टाळण्यासाठी पालक, विद्यार्थी व नागरिकांनी सकारात्मक विचार आचरणाची गरज आहे.
– बी.एस, तलवार,
मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta