गणेशोत्सव केवळ एक दिवसावर; निपाणीत खरेदीसाठी गर्दी
निपाणी (वार्ता) : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन अवघ्या १ दिवसावर येऊन ठेपले आहे. या आगमनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रविवारी (ता.१७) सुट्टीच्या दिवशी गर्दी झाली होती. त्यामुळे रविवार हा खरेदीसाठी सुपर संडे ठरला.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यापासून विविध नमुन्यातील सजावट साहित्यानी दुकाने सजली आहेत. शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी केली असून विद्युत रोषणाईची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गणरायाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी स्वच्छतेसह रंगरंगोटी करण्यात आली आहे. याशिवाय गणेश मूर्तीचे बुकिंग करण्यासह सजावट साहित्य खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत गर्दी झाली होती.
मखर, सिंहासन, कापडी आणि प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, विविध नमुनेच्या साहित्याने बाजारपेठेत ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.
बाजापेठेत सार्वजनिक व घरगुती बाप्पाच्या सजावट साहित्याची रेलचेल असल्याने नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह वाढला आहे. या साहित्यामध्ये प्लास्टिक हार, फुलांसह विविध प्रकारचे पुष्पगुच्छ, पताका, प्लास्टिक हिरवळीचे छत, पाना- फुलांच्या कमानींसह थर्माकोल साहित्याचा समावेश आहे. कागदी व कापडी साहित्यही उपलब्ध असून तोरणांना गणेश भक्तांकडून प्राधान्य दिले जात आहे.
——————————————————————-
लायटींगचे भुरळ
बाजारपेठेत चायनामेड इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा झगमगाट होत आहे. भारतीय बनावटीच्या विद्युत माळा व इतर उपकरणांचा वापर होण्यासाठी काही सामाजिक संस्थांतर्फे जनजागृती केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta