Tuesday , March 3 2026
Breaking News

गणेशोत्सव, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर निपाणीत पोलिसांचे पथसंचलन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवाला सुरुवात झाली शनिवारी (ता.२३) सायंकाळी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन तर सोमवारी (ता.२५ ) सातव्या दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी गणेशोत्सव आणि ईद-ए- मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरुन पथसंचलन केले. जिल्हा पोलीस प्रमुख गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडी विभागाचे पोलिस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथसंंचलन झाले.
पोलिस स्थानकापासून पथसंचलनाला सुरवात करण्यात आली. बेळगाव नाका, जोशी गल्ली, मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामगार चौक, चाटे मार्केट, नरवीर तानाजी चौक, कोठीवाले कॉर्नर, गांधी चौक, जत्राट वेस, अशोक नगर, कित्तूर चन्नम्मा चौक, जुना पीबी रोडसह विविध मार्गावरुन पथसंचलन झाले. जिल्हा राखीव पोलिस दल आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनीही पथसंचलनात सहभाग घेतला.
अनंत चतुर्दशीची सार्वजनिक मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद-ए-मिलादचा कार्यक्रम होणार आहे. सलोख्याच्या वातावरणात दोन्ही उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख खबरदारी घेण्यात आली आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शांत वातावरण कोणीही गढूळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची हयगय केली जाणार नसल्याचा इशारा चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांनी दिला.
अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी पार्श्वभूमी वर शहर आणि ग्रामीण भागात धार्मिक एकोप्याला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी बाळगली जात आहे. गणेश मंडळांनाही नियमांच्या चौकटीत उत्साह साजरा करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. अतिउत्साहाचा अतिरेक होऊन समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन हिंदू व मुस्लिम धर्मियांनी सलोखा राखण्याचे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *