
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची भुरळ; उत्सवाच्या शुभेच्छांचा पाऊस
निपाणी (वार्ता) : सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे दिमाखात आगमन झाले आहे. पाहता पाहता ७ दिवस उलटले. मागील मंगळवार (ता. १९) पासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. घरातील गणपतीची आरास, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र- मैत्रिणींना शेअर केले जात आहेत. विशेष म्हणजे यंदा ‘आमच्या पप्पांनी गणपती आणलाय’ या गाण्याची भुरळ सर्वांनाच पडली आहे.
मित्र परिवार, नातेवाइकांना भेटणे शक्य नसल्याने व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. नेटकऱ्यांनी श्री गणेशाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहेत. वेगवेगळे व्हिडिओ, स्टिकर्स, आरती संग्रहामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ निर्बंधाचा अपवाद वगळता यंदा या उत्सवात जल्लोष व उत्साह दिसून येत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरीही बाप्पांची अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात प्रतिष्ठापना करून आता घरगुती गणेशाचे विसर्जनही झाले आहे. दरवर्षी दिसणारा आरत्यांचा गजर अन् भक्तीचा जागर सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे भक्तांचा उत्साह कायम आहे. हा उत्साह आता अनंत चतुर्थीपर्यंत सोशल मीडियावर राहणार आहे.
————————————————————–
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’
गणेशोत्सव सुरू झाल्यापासुन सोशल मीडियासह युट्यूबर व इतर समाज माध्यमांवर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. छोटी छोटी मुले त्यावर रिल्स बनविताना दिसत आहेत. या गाण्यातील बालकलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला. त्याच्यासोबतच आता चिमुकले स्टार सर्वत्र तयार होत आहेत. गणेशो त्सावत या गाण्याचा सर्वत्र बोलबाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta