निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. येथील मांगुर फाट्यावर उड्डाणपूल उभारण्यात येत असून दगड मातीच्या भरावामुळे परिसरातील शेतकऱ्याच्या शेती सह विविध गावांना पुराच्या पाण्याचा धोका होणार आहे. त्यामुळे भरावा ऐवजी पुलाचे काम कॉलम पद्धतीने व्हावे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना देऊन याबाबतचे निवेदन पुणे येथे भेट घेऊन बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी दिले.
यापूर्वी आलेल्या महापरामुळे सौंदलगा, कुर्ली परिसरातील गावात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. याशिवाय पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम चालू असून निपाणी मतदारसंघातील मांगुर फाटा यथील उड्डाण पुलाचे काम मातीचा भराव घालून केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात महापुराचे पाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात गावासह शेतीवाडीत शिरणार आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाणपूला जवळ भराव न घालता पुलाचे काम कॉलम पद्धतीने व्हावे. मतदार संघातील वेदगंगा शेजारील कुर्ली, भाटनांगनूर, यमगर्णी, सौंदलगा, कोडणी, बुदिहाळ तसेच महाराष्ट्रातील चिखली, अनुर, कौलगे, म्हाकवे या गावासह शेतकऱ्यांना महापुर काळात बॅक वॉटरचा मोठा फटका बसणार आहे. या संदर्भात सीमाभागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी बोरगाव येथील उत्तम पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. याची दखल घेऊन उत्तम पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मंगुर फाटा राष्ट्रीय महामार्ग उड्डाण पुला बाबत सविस्तर माहिती दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या विषयी संमधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची ग्वाही दिली.