
निपाणी (वार्ता) : लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस आणि ठिबकचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारी बोरगाव येथे घडली. येथील हुपरी रोडवरील असलेल्या प्रगतीशील शेतकरी जितेंद्र भोजे पाटील यांच्या ऊसाला लागलेल्या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बोरगाव- हुपरी रस्त्यालगत जितेंद्र भोजे पाटील यांची शेती आहे. विजेचा लंपडाव असतानाही जितेंद्र पाटील यांनी कसेबसे ऊस पिक घेतले होते. अशा संकट परिस्थितीत भोजे यांच्या ऊसाला अचानक आग लागली.
या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाले आहे. ऊसाजवळ गेल्या अनेक महिन्यापासून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. याबाबत त्यांनी संबंधित विभागाला कळविले असतानाही त्यांच्या दुर्लक्षामुळे ऊस व ठीबकचे सर्व साहित्य जळाल्याचे जितेंद्र भोजे- पाटील यांनी सांगितले.
अचानक लागलेल्या आगीमुळे पाटील यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. घटनास्थळी बोरगाव हेस्कॉम शाखा अधिकारी गंगाधर नाईक व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta