
बाळूमामा नगरातील घटना
निपाणी (वार्ता) : शहराबाहेर १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. साकीब समीर पठाण असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पठाण हे निपाणी येथे भाडोत्री घरात जुने संभाजीनगर येथे रहावयास आहेत. साकीब हा आठवी इयतेमध्ये शिकत होता. तो गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजता तो घराबाहेर पडला. मात्र तो घराकडे आला नाही. त्याच्या घरापासून जुने संभाजीनगर येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळूमामा नगर येथील चोपडे यांच्या नवीन बांधलेल्या घराच्या बाजूस साकीब मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर साकीब याची आई, वडील समीर लहान भाऊ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी साकीब हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्यानंतर साकीबच्या आई-वडिलांसह भावाने एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळतात तातडीने घटनास्थळी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भिमाशंकर गुलेद, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे रमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन नेमक्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. घटनास्थळी ठसेतज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला. याबाबत साकीबची आई सिमरन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून घेत चार संशयीतांना ताब्यात घेऊन पुढील तपास चालवला आहे. तपास गौडर यांनी चालविला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta