
स्वाभिमानी शेतकरी संघटना : हालसिद्धनाथ साखर कारखान्याला निवेदन
निपाणी (वार्ता) : सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दीडशे रुपये प्रमाणे व इथेनॉल उत्पादन न करणाऱ्या कारखान्यांनी प्रति टन शंभर रुपये द्यावे. अशा कर्नाटक शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी. याशिवाय एफ आर पी जाहीर केल्याशिवाय यंदाचा गळीत हंगाम सुरू करू नये, याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी (ता.२७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. एन आय. खोत, प्रसन्नकुमार गुजर, प्रशांत पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, गेल्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर केंद्र सरकारने बांधून दिलेल्या दरापेक्षा वाढल्याने कारखानदारांना साखरेच्या उत्पादनातून प्रति टन किमान ५०० रुपये पेक्षा जास्त मिळाले आहेत. याशिवाय कारखान्याकडून निर्माण होणाऱ्या इतर उत्पादनातून कारखान्यांना कोट्यावधीचा फायदा होऊनही शेतकऱ्यांना एकही पैसा त्या मोबदल्यात दिला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री व साखर आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून केलेल्या मागणीनुसार ४०० रुपये प्रति टन शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे. याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कर्नाटकचे कृषी मंत्री साखर आयुक्त व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांनी सदरची रक्कम देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्याची गळीत हंगामापूर्वीच अंमलबजावणी करावी. सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाची एफ आर पी जाहीर करूनच गळीत हंगाम सुरू करावा. ७ सात नोव्हेंबर २०२३ रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या आंतरराज्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांना व कारखानदारांना परवडेल असा जो ऊस दर जाहीर केला जाईल. त्याप्रमाणे सीमा भागातील सर्व कारखानदारांनी दर दिला पाहिजे.
चालू वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, कष्ट, मशागतीचे दुपटीने वाढलेले दर, सरासरी घटलेले ऊस उत्पादन यामुळे अडचणीत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडणी वाहतूक वजा जाता जी येणारी एफआरपी आहे.त्या पेक्षा एफ आर पी सह ५०० रुपये चालू गळीत हंगामासाठी वाढीव देण्यात यावेत.
कारखान्याने शेअर्सची रक्कम वाढवली आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदाला किमान १०० किलो साखर मिळाली पाहिजे. टनेजला दिल्या जाणाऱ्या अर्ध्या किलो साखरे ऐवजी एक किलो साखर मिळावी. वरील मागण्याची अंमलबजावणी आपल्या कारखान्याने ताबडतोब करावी.तसे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आपल्या पद्धतीने विचार करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी प्रसन्नकुमार गुजर, प्रशांत पाटील, विलास मिरजे, तात्यासाहेब पाटील, रमेश मगदूम, दयानंद पाटील, राकेश खवरे, एस.एम. हालभावी, किरण बोरगावे, केदार चौगुले, राजेंद्र कमते, नितीन इंगवले, दत्ता कुलकर्णी, भरत एक्संबे, शकुंतला तेली, प्रतिभा पोवार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta