मनोज जरांगे पाटील यांना निपाणीतून पाठिंबा; धर्मवीर संभाजीराजे सर्कलमध्ये मानवी साखळी
निपाणी (वार्ता) : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात जनआंदोलन सुरू आहे. तसेच मनोज जरांगे-पाटील हे नांदेड जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणासह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निपाणीत येथील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (ता.३१) सायंकाळी मानवी साखळी करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय झाल्यास शुक्रवारी (ता.३) येथील चौकात साखळी उपोषण करण्याचा इशारा मराठा बांधवांनी दिला.
येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात सायंकाळी पाच वाजता मानवी साखळी करण्यात आली.
महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मराठा समाजातर्फे अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र सरकारने अजूनही आरक्षणाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना असून त्यासाठीच सीमाभागातील मराठा बांधव महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या पाठीशी आहेत, हे दाखवत आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निपाणीत मानवी साखळी करण्यात आली.
प्रारंभी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले सडोलकर यांच्याहस्ते धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात साखळी करून विविध घोषणा दिल्या.
गोपाळ नाईक यांनी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी निपाणी येथे मानवी साखळी केली आहे. महाराष्ट्राने याबाबत योग्य निर्णय केल्यास त्याचे पडसाद कर्नाटकात उमरतील असा इशारा दिला.
प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील अनेक कुटुंबियांना शैक्षणिक व इतर सुविधा न मिळाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. आता मराठा समाज जागृत झाला असून आरक्षणासाठी तो लढण्यास सज्ज झाल्याचे सांगितले.
यावेळी उद्योजक रोहन साळवे, सुजय पाटील, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक रवींद्र शिंदे, संतोष सांगावकर निकु पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार, दिलीप पठाडे, वसंत धारव, नगरसेविका शांती सावंत, अनिता पठाडे, दीपक सावंत, वर्षा चव्हाण, जयराम मिरजकर, डॉ. विनय निर्मळे, रमेश भोईटे, बाळासाहेब जासूद, संदीप चावरेकर, नवनाथ चव्हाण यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.