बंडा साळुंखे ; पडलीहाळमध्ये अभियान प्रारंभ
निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी हिंदू धर्मरक्षक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची आवश्यकता कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यालाही आहे. त्यामध्ये परिसरातील हिंदू तरुण-तरुणीने तन-मन-धनाच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर येथील हिंदू नेते बंडा साळुंखे यांनी केले. श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणिलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ‘मी हिंदू धर्मरक्षक अभियानाची’ सुरुवात पडलीहाळ येथून करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. साळुंखे म्हणाले, देशात खून,बलात्कार, अन्याय, अत्याचार घडत असून ही बाब दुर्देवी आहे. हे थांबवण्यासाठी तरुण तरुणींनी राष्ट्र कार्यात झोकून द्यायला हवे. धर्मावर आघात, देवी देवतांचे विटंबन, लव्ह जिहाद, लँड जिहाद गोहत्या हे थांबवण्यासाठीच हे अभियान चालू असून त्यामध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याने सांगितले.
प्रारंभी पडलिहाळ मधील तरुण व तरुणीने मिरवणूक काढून स्वागत केले. मिरवणुकीत राष्ट्रभक्तीपर गीते, जयघोष सोबत ठीक ठिकाणी रांगोळी व पाणी घालून स्वागत करण्यात आले. पडलीहाळ येथील मारुती मंदिरमध्ये श्री हनुमान चालीसा, पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मातृशक्तीच्या इचरकंजी येथील प्रमुख रेवतीताई हनमसागर यांनी मार्गदर्शन केले.
प्राणलिंग स्वामींनी, गडकोट मोहीम, निरोगी आरोग्य यावर मार्गदर्शन करून युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे काम केले आहे. संकटाच्या वेळी राष्ट्रासाठी कार्य करण्याऱ्या तरुणांना सोबत घेऊन त्या संकटांचा सामना केला आहे. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देण्याचे आवाहन केले.
सागर श्रीखंडे यांनी प्रास्ताविक केले. सुचिताताई कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास अँड. गणेश गोंधळी, सुमित सासणे, अरुणाताई माने, आर्या भंडारी यांच्यासह पडली हाळमधील नागरिक व तरुण उपस्थित होते.