निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास एकनाथ धुमाळ (वय ७४) यांचे बुधवारी (ता.८) निधन झाले.
प्रा. धुमाळ यांनी १९६७ पासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे सचिव म्हणून काम पाहिले. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. कर्नाटक भाषिक अल्पसंख्यांक संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. १९६७ साली किसान शिक्षण संस्थेमार्फत चिकोडी तालुक्यातील पहिली इंग्लिश मीडियम शाळा स्थापन केली. काही कारणास्तव ही शाळा हस्तांतरित करावी लागली. त्यानंतर १९८७ साली सीमाभागातील मराठी भाषिक बहुजन वर्गासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्याच्या अंतर्गत नूतन मराठी विद्यालय, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक विभाग, श्री. व्यंकटेश्वरा पदवी पूर्व कॉलेज, डीएमएलटी, बालवाडी प्रशिक्षण केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ दूर शिक्षण केंद्र, याच्या अंतर्गत सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २००९ साली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नात, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.९) सकाळी नऊ वाजता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta