निपाणीत वीकेंडच्या पहिल्या दिवशी सामसूम : बँका, एटीएम बंद
निपाणी (संजय सुर्यवंशी) : शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधीतसह मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.4) ते रविवार (ता.6) पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली होती. त्यामुळे निपाणी सामसूम दिसत नागरिक घरात, रस्त्यावर शुकशुकाट असे चित्र दिसत होते.
शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात बॅरिकेड्स घालून सर्व रस्ते बंद केले होते. त्यामुळे शहरवासीयांनी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच बँक आणि एटीएम बंद असल्याने दिवसभर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. शहरातील नेहमी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर मेडिकल दुकान अशा अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही नव्हते. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी लावली जाणारी खरी संचारबंदी लागल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. रविवार (ता. 6) पर्यंत अशाच प्रकारचे कडक निर्बंध राहणार आहेत. कडक लॉकडाऊन असल्याने शहरातील अशोक नगर, गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ, नरवीर तानाजी चौक, चाटे मार्केट, बेळगाव नाका कोल्हापूर वेस, मुरगुड रोड, चिक्कोडी रोड रस्त्यावर शनिवारीवरील सर्वच ठिकाणी भयाण शांतता पाहायला मिळाली. मुख्य रस्तासोबत गल्लीबोळातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. वीकेंडच्या पार्श्वभूमीवर पोलीसांतर्फे जनजागृती करून दोन दिवस घराबाहेर विनाकारण पडणाऱ्या नागरिकावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. लॉकडाऊनमुळे सर्व वाहने थांबली होती. शहरातील धर्मवीर संभाजीराजे चौक, बेळगाव नाका, साखरवाडी, कोल्हापूर वेससह चौकाचौकात पोलीस फौजफाटा असल्याने दिवसभर नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्याशिवाय आणखीन एक दिवस शहरातील किराणा दुकानेही बंद राहणार आहेत. एकंदरीत वीकेंडला निपाणी शहरातील सर्व स्तरातील व्यापारी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.—-