नगरसेवक विलास गाडीवड्डर : सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढा
निपाणी (वार्ता) : सप्टेंबर २०१८ नंतर निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात आले. त्याला पाच वर्षाचा कालावधी उलटत आहे. तरीही या काळात राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना निपाणी चा पाणी प्रश्न सोडविता आलेला नाही. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने कोणाकडे दाद मागायची हा मुद्दा निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात पाणी बाणी निर्माण झाले आहे. यावर सर्वपक्षीय बैठक बोलावून तात्काळ तोडगा न निघाल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिला. शहरातील पाणी प्रश्न आणि मूलभूत समस्या बाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर शुक्रवारी (ता.१०) दुपारी आयोजित विरोधी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते.
नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले, यंदा कमी पाऊस झाल्याने पाणी पातळी ३७ फुट इतकी आहे. मात्र पालिकेत पदाधिकारी नसल्याने अधिकार शाही सुरू आहे. हे अधिकारी पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या स्वार्थाकडे लक्ष देत आहेत. लोकप्रतिनिधींना मंत्रीपद असतानाही आपल्या काळात 24 तास पाणी योजना पूर्ण करता आलेली नाही.यापूर्वी आपणांसह काही सामाजिक संस्थांनी पाणीपुरवठ्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले. पण त्याकडेही नगराध्यक्षासह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने सध्या चार ते पाच दिवसात एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. भरमसाठ पाणी बिल घेऊनही पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा पगार दिला जात नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी दीपावली नंतर नगरपालिकेत बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचा आश्वासन दिले आहे. बैठक न बोलवल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा निर्धार नगरसेवकांनी केला आहे. तत्कालीन सभागृहाच्या हटवादीपणामुळे निपाणीची परिस्थिती बिकट बनली आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेतल्यास विरोधी नगरसेवकांना रुद्रावतार दाखवावा लागेल असेही विलास गाडीवड्डर यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, रवींद्र शिंदे, दत्ता नाईक, शौकत मनेर, संजय पावले, संजय सांगावकर, शेरू बडेघर, डॉ.जसराज गिरे, दिलीप पठाडे, सचिन गारवे, सुनील शेलार, दीपक सावंत, विशाल गिरी, अनिस मुल्ला यांच्यासह विरोधी गटातील नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta