झेंडू फुलाला दराची झळाळी
निपाणी (वार्ता) : दसरा आणि दिवाळीला झेंडू, शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील सर्वच रस्त्यावर दिवाळी लक्ष्मीपूजन पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १२) पिवळ्या, केशरी, झेंडूसह शेवंतीच्या फुलांच्या राशी पडल्या होत्या. दसऱ्याला दर पडले होते. मात्र दिवाळीमध्ये दरात विक्रमी वाढ झाली झाली. किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपयापर्यंत झेंडू फुलांची विक्री झाली. तसेच शेवंती १८० ते २०० रुपये किलो झाला होता. पाच उस, केळीच्या झाडांची जोडी ५० रुपयांना विक्री झाली. झेंडूच्या फुलांना दसऱ्यानंतर आता दिवाळीत चांगला भाव आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र आर्थिक फटका बसला. यंदा पाऊसच नसल्याने शेतातील फुलांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात फुलांची आवक फक्त ४० टक्केच झाली. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने अचानक झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे दर वाढले. एरवी १० ते २० रुपये किलो असलेला झेंडू दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात ५० रुपये किलो तर शेवंती १५० रुपयावरून २०० रुपयावर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फुले खरेदी करण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागला.
दिवाळी मधील पूजेला हार आणि तोरणे लावून पूजा करण्यात येत असल्याने या फुलाला विशेष मागणी दिसून आली. यंदा ग्राहकांना लक्ष्मीपूजनसाठी किरकोळ फुले आणि हार वाहूनच पुजा करण्याची वेळ आली. शहरात खडकलाट, शिरगुप्पी, तवंदी, भिवशी आणि ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतातील फुले विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र वर्षी झेंडूचे उत्पादन कमी असल्याने गेल्या वर्षीच्या मानाने किमतीत दुपटीने वाढ झाली होती. बाजारात झेंडूच्या फुलांसोबत शेवंती, निशीगंधा, गुलाबांच्या फुलांचेही दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
—————————————————————-
लक्ष्मी पूजन साहित्य खरेदीसाठी झुंबड
लक्ष्मी पूजन हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस समजला जातो. या दिवशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. रविवारी (ता. १२) लक्ष्मीपूजन असल्याने पूजा साहित्यासह खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले.
पुजेसाठी लागणारे खारीक, खोबरे इतर वस्तू २० रुपयाला मिळाली. सुपारी १० रुपये, गुलाल, हळद, कुंकू पाकिट १० ते २० रुपये, अगरबत्ती १० -५० रुपये, कापूर १० रुपयापासून २५ रुपये, वाती १० रुपये, नारळ २० ते २५ रुपये, नागवेलीचे पाने १० रुपये, लक्ष्मीची पावले १० रुपये, पाटावरील कापड २० ते २५ रुपये, विविध प्रकारची पाच फळे ५० ते ८० रुपये या दराने पूजा साहित्याची विक्री केली जात होती. लक्ष्मी पूजनात केरसुणीला विशेष महत्त्व असल्याने बाजारात लक्ष्मीची (केरसुणी) जोडी ९० ते १०० रुपयांना विकली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta