स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा : हालशुगरला दिली खर्डा भाकरी
निपाणी (वार्ता) : गतवर्षाच्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० चारशे रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१२) सायंकाळी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रा.एन. आय. खोत यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातून महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली. याशिवाय येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला खर्डा भाकरी देऊन योग्य दराशिवाय ऊसतोड करू नये,असे आवाहन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस परिषद झाली. त्यामध्ये गतवर्षीच्या उसाला प्रति टन चारशे रुपये देण्यासह यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये देण्याची मागणी केली आहे. तरीही कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी ३ हजार रुपये दर जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हादर ऊस उत्पादकासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड वाहने रोखून धरण्याचा सपाटा लावला आहे. कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात घेऊन जाणारी वाहने रविवारी येथील देवचंद महाविद्यालय परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली. यावेळी कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यासह पोलिसांनी कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तरीही कार्यकर्त्यांनी न घाबरता महाराष्ट्रात जाणारी सर्वच वाहने रात्री उशिरापर्यंत रोखून धरली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. एन. आय. खोत यांनी, संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सीमा भागात हे आंदोलन केले जात आहे. कारखान्यांनी जाहीर केलेला दर शेतकरी सह संघटनेला मान्य नाही. त्यामुळे रविवार पासून ऊस वाहतुकीची वाहने संघटनेतर्फे रोखण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला तोड देऊ नये. दोन दिवसात संघटनेची मागणी मान्य न झाल्यास ऊस वाहतुकीचे वाहने फोडण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब पाटील, विकास समगे, भाऊसाहेब झिनगे, प्रतीक पालवे, माणिक पाटील, विजय कापडे, सूर्यकांत खेडे, सचिन चौगुले, पांडुरंग खेडे, गणपती कापडे, महादेव कमते, सुरेश बेनाडे, सुवेद चौगुले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta