Wednesday , April 22 2026
Breaking News

बुधवारी पदग्रहण, गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा

Spread the love

 

भाजपचे नुतन अध्यक्ष विजयेंद्र यांची माहिती

बंगळूर : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी (ता. १५) पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. जगन्नाथ भवन येथे सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते तुमकूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
मावळते अध्यक्ष नळीनकुमार कटील यांनी अध्यक्ष म्हणून खूप काम केले आहे. त्यांनी राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघात जाऊन संघटन करून आम्हाला मोठा विजय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
गुरूवारी (ता. १६) बंगळूर येथील पॅलेस ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे. पक्षाला चालना देण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, डी. व्ही. सदानंद गौडा, माजी मंत्री व्ही. सोमण्णा, गोविंद कारजोळ, बसनगौडा पाटील यत्नाळ आदी यावेळी उपस्थित रहाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात भीषण दुष्काळ असल्याने आमचा पक्ष याला प्रथम प्राधान्य देणार आहे. १६ तारखेला विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याच्या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. पक्षाचे नेते निरीक्षक पाठवतील. सर्वांशी चर्चा करून एकमत असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पक्ष असल्याने किरकोळ मतभेद आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाचे नेतृत्व केले जाईल. कोणाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वांना विश्वासात घेतल्यास पक्ष मजबूत होईल, असेही ते म्हणाले.
कोणाकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग नाही. विधानसभा निवडणुकीत आम्हाला धक्का बसला असला तरी लोकसभा निवडणुकीत अधिक जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिद्धगंगा मठाला भेट देऊन त्यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पक्षाची जबाबदारी म्हणून पहिल्यांदा आमदार झालो, आता अध्यक्ष होतोय. त्याशिवाय मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात सर्वत्र फिरून पक्ष संघटित करून गरीब आणि शेतकऱ्यांच्या दुष्ट आणि भ्रष्ट सरकारविरुद्ध लढायचे आहे. जनतेला सत्य सांगण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
आमचे वडील बी. एस. येडियुरप्पा कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी सिद्धगंगा येथे जात आणि गुरूंचे आशीर्वाद घेत. त्याचप्रमाणे मलाही श्रींचे आशीर्वाद मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष हेब्बाक रविशंकर, बी. के. मंजुनाथ, उपाध्यक्ष एम. बी. नंदिश, जी. बी. ज्योती गणेश, बी. सुरेशगौडा, हुलीनायकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *