निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक आणि उद्यान नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे सुनील वराळे आणि गणेश शिरसिंगे यांनी तहसीलदार कार्यालयाला दिले.
निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस वर्षापासून मल्लिकार्जुन नगरात आणि कुटुंबे वास्तव्यास आहेत. पण या ठिकाणी स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पावसाळ्यामध्ये मोठी अडचण निर्माण होत असल्याने या ठिकाणी स्मशानभूमी निर्माण करणे आवश्यक आहे. याशिवाय मल्लिकार्जुन नगरात बस थांबा असून निवारा शेड नसल्याने ऊन पावसात नागरिकांना बसची वाट पाहत रस्त्यावर थांबावे लागत आहे. वृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उद्यान निर्मिती करावी.
तहसीलदार कार्यालयातील मृत्युंजय डंगी यांनी निवेदन स्वीकारून याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रती आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पाठविण्यात आले आहेत.
निवेदनावर विनोद शिरसिंगे, कांचन भोसले, अनिता जनवाडे, सूर्यकांत जनवाडे, अजित कळसन्नावर, साताप्पा भोरे, रामा वराळे, कल्लवा गोरे, प्रमोद वराळे, रेखा वराळे, सर्जेराव गुरव, महादेवी जनवाडे, दिनकर गुरव, ताराबाई लवटे, संदीप जावीर यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta