एकरासाठी २५ हजारांचा खर्च; कांदा लागवडीकडे कल
निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे कांद्याची रोपे पाणी देऊन जगवावी लागली. तर तरुचे उत्पादन कमी झाल्याने लागवडीवर परिणाम होत आहे. सध्या कांद्याच्या दराने पन्नाशी पार केली असली तरी कांदा शिल्लक नाही. त्यामुळे पुढील हंगामात तरी उत्पादन चांगले मिळेल या आशेने कांद्याची रोपे मिळेल तेथून आणली जात आहेत. त्यामुळे एक एकर कांदा लागवडीसाठी २५ ते ३० हजारांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ तरूलाही सोन्याचा भाव आला आहे.
निपाणी तालुक्यात सौंदलगा, आप्पाचीवाडी, कोगनोळी आणि बेनाडी परिसरातील शेतकरी कांद्याचे पीक घेतात. यंदा परतीचा पाऊस न झाल्याने कांदा तरुची लागवड उशिरा होत आहे. बाजारपेठेत कांदा उपलब्ध होत नसल्याने परराज्यातील कांदा येत असून दर आवाक्याबाहेर आहेत. शेतकऱ्यांची स्वतःची कांद्याची रोपे असायची, पण यंदा पाणीटंचाईसह रोपासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. काही शेतकऱ्यानी पावसाची वाट पाहून नदी विहिरीच्या पाण्यावर कांदा बियाणे टाकल्याने किरकोळ प्रमाणात तर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्ये होणारी लागवड डिसेंबर, जानेवारीत होईल. असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोषक वातावरणामुळे चिक्कोडी भागातील कांद्याची रोपे निपाणी बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. पण २५ काड्यांची पेंडी १० ते १२ रुपयांपर्यंत विकली जात आहे.
————————————————————-
ज्वारी, गहू क्षेत्रावर भर
यंदा परतीचा पाऊस न झाल्याने कांदा रोपांची लावून लागवड करणे कठीण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी,गहू आणि हरभरा पिकावर भर दिला आहे. परिणामी यंदा गहू आणि ज्वारीचे क्षेत्रातही वाढणार आहे.
—————————————————————-
‘दरवर्षी हंगामात वीस रुपयांना पाच पेंड्या कांद्याच्या रोपांची विक्री होत असे. यंदा पावसाअभावी रोपे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शंभर रुपयांना आठ ते दहा रुपये पेंड्यांप्रमाणे विक्री होत आहे.
– नामदेव कदम, कांदा तरु विक्रेते यमगर्णी,
Belgaum Varta Belgaum Varta