राजू पोवार; ऊस दराबाबत जनजागृती बैठक
निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल, बी- बियाणे, मजुरी, खतांचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. दरवर्षी कारखान्यांना जाणाऱ्या उसामुळे कारखानदार मोठे झाले असून शेतकरी रसा तळास जात आहे. खर्चाच्या तुलनेत ऊसाला दर देण्याची मागणी करूनही त्याकडे कारखान्यानी दुर्लक्ष केले आहे. यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित येऊन ५५०० रुपये दर देण्याची मागणी रयत संघटनेने केली आहे. हा दर देणे कारखानदार व सरकारला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी गडबड करून उसाला तोड देऊ नये, असे आवाहन रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. हंचिनाळ आणि आडी येथे ऊस दरात बाबत आयोजित जनजागृती बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर बाबासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजू पोवार म्हणाले, ऊसासह शेतकऱ्यांच्या इतर पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. यापूर्वी अतिवृष्टी, महापूर दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संघटनेने आंदोलने केली आहेत. त्याला काही अंशी यश आले आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी संघटनेने घेतली आहे. कारखान्यानंतर आता थेट हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकारी व म मंत्र्यांना घालून शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही पोवार यांनी केले.
यावेळी सागर पाटील, रोहन नलवडे, रमेश कोळी, सचिन कांबळे, दादासो चौगुले, सनी भंगे, एम. वाय. हवालदार, बाबासाहेब पाटील, नामदेव सांळुंखे, प्रवीण सुतळे, सर्जेराव हेगडे, प्रवीण जनवाडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.