निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल कर्नाटक राज्य सहकार क्षेत्रातर्फे ‘सहकार रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोमवारी (ता.२०) विजापूर येथे झालेल्या सहकार सप्ताह समारोप कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रावसाहेब पाटील (दादा) यांना यापूर्वीहा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर उत्तम पाटील यांना हा दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्तम पाटील हे वडील रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात अविरतपणे कार्य करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून बोरगाव येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची त्यांनी धुरा सांभाळली आहे. शेतकरी, सभासद व गरजवंतांना वेळेत पत निर्माण करीत कृषी संघ सहकार क्षेत्रासह इतर क्षेत्रातही त्यांनी प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना राजकारण बाजूला ठेवून कार्य केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखालील सर्वच सहकारी संस्था आदर्श रूपात आले आहेत. त्यांनी सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देत त्याच्या माध्यमातून अनेक वंचित गोरगरीब कुटुंबांना न्याय दिला आहे. महापूर, कोरोना अशा परिस्थितीतही लोकांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूही पुरवठा केल्या आहेत. बेळगाव जिल्हासह निपाणी तालुक्यातही सहकार क्षेत्र वाढावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करुन नवीन ७ कृषी पत्तीन सहकारी संघाना मंजुरी मिळवून दिली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहेत. सहकार क्षेत्र हे एक समाजाभिमुख क्षेत्र व्हावे, हा उद्देश त्यांनी ठेवल्याने त्यांच्या कार्याची पोचपावती पाहून कर्नाटक राज्य सरकारने त्यांना सहकाररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी साखर मंत्री शिवानंद पाटील, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, के. एन. राजन, पालकमंत्री एम. बी. पाटील, रमेश जिगजिनगी, पी.सी. गद्दीगौडर, आप्पाजी नाडगौडर, अशोक पट्टण, यशवंतराव पाटील, आमदार विनय कुलकर्णी, राघवेंद्र एइटनाळ, विठ्ठल कटक, अशोक मनगुळी राजूगौडा पाटील, सुनीलगौडा पाटील, दुर्योधन ऐहोळे, हनुमंत निराणी यांच्यासह विविध जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि मंत्री उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta