कागदपत्रांचीही तपासणी; दिवसभर कारवाई
निपाणी (वार्ता) : जिल्ह्यात दुचाकी चालकांना हेल्मेट
वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत चार दिवसांपूर्वी निपाणी पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यावर थांबून दुचाकी शहरांमध्ये जनजागृती केली होती. मंगळवारपासून (ता.२१) हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी व सहकाऱ्यांनी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात दुचाकी चालविणाऱ्यांना अडवून दिवसभरात हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वरावर दंडात्मक कारवाई केली. तर अनेकांच्या दुचाकी ताब्यात घेऊन त्यांना घरी पाठविले. त्यामुळे दुचाकीस्वारांची धावपळ उडाली.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, नोकरदार व्यवसायिक आणि नागरिकांच्या दुचाकी अडवून हेल्मेट व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. धर्मवीर संभाजीराजे चौकात ही कारवाई सुरू केल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली आहे.
वर्षभरात दुचाकी स्वारांच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी जिल्हा प्रमुखांच्या सूचनेनुसार मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग, आंतरराज्य मार्ग, शहरासह ग्रामीण भागातील दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती केलीआहे. गत वर्षात झालेल्या एकूण अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये डोक्याला मार लागल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दुचाकीचालक आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुद्धच्या कारवाईमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी चांगल्या प्रतीचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. अन्यथा सदर दुचाकी चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची कारवाई केली जाणार आहे.
मंगळवारच्या कारवाईमध्ये शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांच्या नेतृत्वाखाली एस. के. नरेगल, सुदर्शन अस्की आणि सहकारांनी सहभाग घेतला.
अनेक दुचाकी स्वारावर दंडात्मक कारवाई करून या पुढील काळात नियमितपणे हेल्मेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय पुन्हा हेल्मेट न वापरल्यास या पेक्षा कडक कारवाई करण्याच्या सूचना पथकातील कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.
————————————————————–
‘निपाणी भागात हेल्मेट सक्ती मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे. दुचाकीवर हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा. सलग तीन वेळा कारवाई केल्यावरही हेल्मेट न वापरल्यास वाहन जप्तीची कारवाई होणार आहे.’
-उमादेवी, पोलीस निरीक्षक, निपाणी.