माजी आमदार काकासाहेब पाटील : पाणी प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने २५ नगरपालिकांना अमृत योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी ३२ कोटी ८६ लाख इतके अनुदान दिले आहे. या अनुदानाचा योग्य उपयोग होऊन त्याचा निपाणी शहरवासीयांना लाभ व्हावा, अशी मागणी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केली. शनिवारी (ता.९) दुपारी साखरवाडीवरील काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, विद्यमान आमदार व खासदारांनी दूधगंगा नदीपासून पाईपलाईन योजना राबवून त्याच ठिकाणी जॅकवेल बांधून पाणीपुरवठा होणार असल्याचे म्हटले आहे. दूधगंगा नदीपासून कोल्हापूरला थेट पाणी योजना राबविली आहे यापूर्वी गैबी बोगद्यातूनही पाणी नेले आहे. त्यानंतर आता सुळकूळ धरणापासून इचलकरंजीला थेट पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने काठावरील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे. अशा परिस्थितीत दूधगंगा नदीवरून पाणी योजना राबविणे योग्य वाटत नाही.
यापूर्वी आपणांसह माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह नेते मंडळींनी प्रयत्न करून वेदगंगा नदीवर जॅकवेल उभारण्यासह एमएस पाईप लाईन घातली आहे. याशिवाय काळमवाडी प्रकल्पाद्वारे चिखली येथून एक टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे. सन २०२० पर्यंत पाण्यासाठी एकही मोर्चा निघाला नाही. आता दोन-तीन वर्षात नगरपालिका प्रशासनाला पाणी योजना राबविण्यात अपयश आले आहे. याशिवाय महत्त्वाच्या पाणी प्रश्नाकडे सध्याच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या मंजूर झालेल्या निधीचा दुरुपयोग होऊ नये. सध्याच्या निधीतून पिण्याच्या पाण्याचा साठा करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे निपाणीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात निघणार आहे. डोंगर विभागातून पावसाळ्यात येणारे पाणी, पुण्यातून येणारे पाणी आणि वेदगंगेचे पाणी अशा माध्यमातून पाणीसाठा करता येणे शक्य आहे. यामध्ये कोणीही सूर्यवाद घेऊ नये.
दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना पिण्याच्या पाण्याबाबतच्या योजनेची माहिती घेऊन योजना मंजूर करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाचे मंत्री एन.एस. बसवराज यांनी सोमवारी सर्वेक्षणासाठी आदेश दिल्याचे काकासाहेब पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, शासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्याचा सर्वांनी सदुपयोग करून घेतला पाहिजे. दूधगंगा नदीपासून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती पाणी योजना राबविले आहेत. सध्या या पाण्यासाठी शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील नागरिकांचा विरोध सुरू असताना पुन्हा तेथूनच पाणी आणणे चुकीचे ठरणार आहे. याशिवाय अनेक तांत्रिक अडचणी ही आहेत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या हिताची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, भविष्यातील निपाणी व परिसरातील नागरिकांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन ही योजना योग्य पद्धतीने राबविणे गरजेचे आहे. यापूर्वी मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या यांनी तलाव निर्माण व तलाव भरण्याची कामे केली आहेत. त्यानुसार मंजूर झालेल्या अनुदानाचा वापर व्हावा, असे सांगितले.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती विश्वास पाटील, संदीप चावरेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.