मानवी साखळी करुन निदर्शने; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी चिकोडीत भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चिकोडी संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन समिती, वकील संघटनेसह विविध संघटना व नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. बस स्थानकापासून के. सी. रस्ता, नगर परिषद चौक, गुरुवार पेठ, कृष्णा सर्कलमार्गे बसव सर्कलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी काही वेळ मानवी साखळी करुन निदर्शन करण्यात आली. त्यानंतर चिकोडी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांना निवेदन देण्यात आले.
संपादना स्वामी म्हणाले, गेल्या ३० वर्षापासून चिकोडी जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे. पण अचानक अथणी जिल्ह्याची मागणी करणे चुकीचे आहे. चिकोडी शहरात सर्व जिल्हास्तरीय कार्यालये व सुविधा असून आमची मागणी रास्त आहे. लोकप्रतिनिधींनी चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा आंदोलन समितीचे सचिव चंद्रकांत हक्केरी म्हणाले, यापूर्वी आश्वासन दिलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिकोडी जिल्ह्याची घोषणा करावी. तसेच लोकप्रतिनिधीनी मौन न बाळगता चिकोडी जिल्हा मागणीसाठी सरकारवर दबाव टाकावा. अथणी जिल्ह्याची मागणी करण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले.
युवा नेते श्रीनाथ घट्टी यांनी, चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी अनेक वर्षे आंदोलन सुरु आहे. राजकीय नेते केवळ आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी चिकोडी जिल्हा जाहीर करावा अन्यथा बेळगावातील सुवर्णसौध मधील अधिवेशनात पेटवून घेण्याचा इशारा दिला.
यावेळी नगराध्यक्ष ऍड. प्रवीण कांबळे, ऍड. एस. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चिकोडी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष संजू बडीगेर, नागेश माळी, नागराज मेदार, संतोष टवळे, विश्वनाथ कामगौडा, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, ऍड. सतीश अप्पाजीगोळ यांच्यासह विविध संघटनेचे सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta