शहराच्या वेशीवर कोरोनाची धडक : रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटकातून वाढत्या कोरनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने नाईट कर्फ्यूबरोबरच शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यू पुकारला आहे. या विकेंड लॉकडाऊनला निपाणी शहर परिसरात रविवारीही(ता.9) चांगला प्रतिसाद मिळाला. एसटी बस रिक्षा, खाजगी वाहने आणि अत्यावश्यक व सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. शनिवारी शहराबाहेरील एका उपनगरात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
विकेंड कर्फ्यूमुळे शहरातील वाईन्स शॉप, हॉटेल, कापड दुकाने, स्टेशनरी , मोबाईल शॉप, सराफी दुकाने, शू-मार्ट, दुचाकी चारचाकी वाहन गॅरेज असे सर्वच व्यवहार बंद होते. किराणा दुकान, भाजीपाला, फळे, मांस हॉटेल खानावळ बस, अॅटो टॅक्सी शासकीय – खासगी रुग्णालय, औषध दुकाने, शेतकरी पशुखाद्य, खत अशी सर्वच जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरु राहिल्याने नागरिकांची सोय झाली. त्यामुळे विकेंड कर्म्युला नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपला पाठिंबा दर्शविलेला दिसला. बसस्टँडमध्ये बससेवा सुरु असली तरी विकेंड कर्फ्यूमुळे रविवारी प्रवाशांची वर्दळ कमी होती. बस स्थानक परिसरात अनेक बस थांबूनच होत्या. शहरात मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसूर, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बंद काळात अनावश्यक व विना मास्क फिरणार्यावर रविवारी पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पोलीसांनी कारवाईसाठी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रार्दभाव वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसात रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले असले तरी निपाणी शहरात एकही रूग्ण आढळला नव्हता. मात्र शनिवारी येथील प्रतिभा नगर मधील 37 वर्षिय महिला कोरोना संक्रमीत झाल्याचा अहवाल सरकारी रूग्णालय प्रशासनाला मिळाला आहे. सदर महिलेने दोन कोरोना लसीचे डोसही घेतले असून देखील त्या संक्रमीत म्हणून आढळल्या आहेत. सदर महिला प्रवासाठी जाणार असल्याने तपासणी करून अहवाल मागविला होता. दोन लसीचे डोस घेवूनही अहवाल संक्रमीत आल्याने शहरात पुन्हा नागरीकात भिती निर्माण झाले आहे . त्यामुळे नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करीत मास्कचा वापर करीत सामाजीक अंतर पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.