निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात निकोप समाज निर्मितीसाठी विज्ञान जागृती करण्याच्या हेतूने कुर्ली येथील एच जे सी चिफ फौंडेशन सतत २० वर्षे कार्य करीत आहे. ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे उपक्रम आयोजित केले जातात. त्याचा या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक याना फायदा होत आहे. या वर्षी रविवारी (ता.१७) या संमेलनात प्रायोगिक विज्ञान व प्रात्यक्षिक कौशल्य, विज्ञान प्रदर्शन, मॉडेल रॉकेटरी, आरोग्य व आहार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे विज्ञान साहित्य संमेलन जागृतीचे प्रभावी माध्यम ठरत असल्याची माहिती कुन्नूर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली अमृतसमन्नावर यांनी दिली.
अमृतसमन्नावर म्हणाल्या, विज्ञान संमेलन हे ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासूनच विज्ञानाची आवड निर्माण करणे, आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तुमागील वैज्ञानिक तत्व माहिती करून घेणे, भविष्यात तंत्रज्ञानामुळे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे लागेल याबाबत जागरूकता निर्माण करणे. समाजामध्ये पर्यावरण पूरक जीवनशैली रुजविण्यासाठी प्रयत्न करणे, या हेतूने कुरली हायस्कुलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले जात आहे.
विज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता येत असतात. याबाबतचे प्रबोधन या संमेलनात होते. विविध प्रयोगिक सत्राव्दारे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना तज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या आधारे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात पूरक बदल करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची, भविष्यात घडणारे आमूलाग्र बदल व कृत्रिम बुद्धिमत्ता याची माहिती मिळत आहे.त्यामुळे हे संमेलन विज्ञान प्रचाराचे प्रभावी जनजागृती माध्यम ठरत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta