निपाणी (वार्ता) : बंगळूर कर्नाटक जैन असोसिएशनतर्फे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील यांना ‘जिनधर्म प्रभावक’ पदवीने सन्मानित करण्यात आले. रावसाहेब पाटील यांच्या अनुपस्थितीत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळूर येथील कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.
दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून रावसाहेब पाटील यांनी गेल्या १५ वर्षापासून कर्नाटक-महाराष्ट्रात जैन धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिक्षण घेणाऱ्या जैन समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करून विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली. बंगळूर येथे शिक्षण घेणाऱ्याही विद्यार्थ्यांना राहण्याची व शिक्षणाची सोय व्हावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. याशिवाय विविध क्षेत्रातील त्यांचे सामाजिक कार्य पाहून कर्नाटक जैन असोसिएशन यांच्या वतीने रावसाहेब पाटील यांना जिनधर्म प्रभावक पदवीने सन्मानित आले.
रोख १ लाख रुपये, चांदिचे सन्मानपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. श्रवण बेळगोळ मठाचे भट्टारक अभिनव चारूकीर्ती स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री डी. सुधाकर, डॉ. सुरेंद्र हेगडे यांच्या हस्ते उत्तम पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्तम पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करून
पुरस्काराची १ लाख रुपये व पाटील कुटुंबीयांचे १ लाख असे २ लाख रुपये चारुश्री शिष्यवृत्तीसाठी देत असल्याचे सांगितले. यावेळी के. जे. एचे अध्यक्ष बी. प्रसन्नया, माजी अध्यक्ष एस. जितेंद्रकुमार, विभागीय उपाध्यक्ष जी. जी. लोबोगळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.