निपाणीत हुतात्म्यांना अभिवादन
निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नाचा साठ वर्षे लढा सुरू असून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यासह राज्यपालांची या प्रश्नावर चर्चा झाली आहे. कर्नाटकाची बाजू भक्कम असून महाराष्ट्रानेही आपली भूमिका ठामपणे बजावली आहे. त्यामुळे आता अखेरच्या टप्प्यात युवकांचा निर्धार महत्त्वाचा आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले.
बुधवारी (ता.१७) येथील साखरवाडी मधील हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी श्रीमंत विजयराजे देसाई -सरकार व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा कमलाबाई मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र वाहण्यात आले. नंतर स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. माने म्हणाले, सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्रानेही ठराव मांडल्याने सीमावासीयांना बळ मिळाले आहे. काश्मीर, पंजाब, मेघालयाचा प्रश्न सुटला. पण कर्नाटक -महाराष्ट्र सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे.
लोकशाहीमध्ये मागणीचा हक्क हिरावला जात आहे. शासन संवेदनशील असून त्यांनाही या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. अजूनही पोलीस बाळाचा वापर करून मराठी भाषेवर अन्याय केला जात आहे. लवकरच कोल्हापूर, बेळगाव किंवा मुंबई येथे सीमा प्रश्नावर गोलमेज परिषद होणार असून त्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणी भाग अध्यक्ष जयराम मिरजकर यांनी, सीमा प्रश्न सोडवणुकीबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने हालचाली गतिमान केले आहेत. आता या प्रश्नावर पाऊल पुढे पडले असून सीमा वासीयांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. यावरच न थांबता लढ्याची तीव्रता वाढवावी लागणार असल्याचे सांगितले.
शिवसेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब खांबे यांनी, सीमाप्रश्नाबाबत मराठी भाषिकांच्या पाठीशी शिवसेना नेहमी आग्रही आहे. या प्रश्नाबाबत जागृती होण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठका घेतल्या जातील. लवकरच सीमाभागातून कार्यकर्ते दिल्लीलाधडक देण्याची तयारी करीत आहेत. महाराष्ट्रही सीमावाशीयांच्या पाठीशी असून हा निकाल सीमावाशीयांच्या बाजूने लागेल असा विश्वास असल्याचे सांगितले.
प्रा. एन. आय. खोत यांनी, सीमा प्रश्नातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. कर्नाटक महाराष्ट्राचे केंद्र सरकारमधील नेत्यांची चर्चा सुरू असून हा प्रश्न लवकरच सुटेल. न्यायदेवतेवर विश्वास असून ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट होतील असे सांगितले.
लक्ष्मीकांत पाटील यांनी, सध्या सीमाप्रश्न सोडवण्याची बाबत वातावरण निर्मिती झाली आहे. लवकरच या लढ्याला यश मिळून मराठी भाषिकांच्या बाजूने न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिन पोवार, गोपाळ नाईक, रमेश निकम, हेमंत चौगुले, संजय बाळासाहेब कमते, प्रशांत नाईक, सुनील हिरुगडे, उदय शिंदे, बाळू हजारे, जयवंत पोवार, संदीप चावरेकर, अनिल निकम यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते.
——————————————————————-
बॅ. नाथ पै यांना अभिवादन
हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी भाषिक नागरिकासह महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————-
बंदला संमिश्र प्रतिसाद
हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती आणि शिवसेनेतर्फे हुतात्मादिनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील अनेक मराठी भाषिक व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला.