आमदार भालचंद्र जारकीहोळी; संकनकेरी येथे शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र राज्यातही त्यांनी आपल्या संस्थेच्या शाखा विस्तारित करून शेतकरी, सभासद, व्यापारी, कामगार, दूध उत्पादकांच्या आर्थिक जडणघडणीत मोलाचे सहकार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासू संस्था म्हणूनराज्यात अरिहंत संस्थेकडे पाहण्यात येत आहे. संस्थेचे ठेव उद्दिष्ट पूर्ण होण्या बरोबरच ४००० कोटी ठेवींचेही उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचे, मत अरभावी मतदारसंघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
मुडलगी तालुक्यातील संकणकेरी येथे श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेचे शाखा उद्घाटन आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत संस्था ३३ वर्षापासून सहकार क्षेत्रात कार्य करीत आहे. नफा हा उद्देश बाजूला ठेवून सभासद शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. संकणकेरी व परिसरातील गरजूंना वेळेत पत मिळावे व परिसरातील अर्थकारणात भर पडावी, यासाठी या ठिकाणी संस्था सुरू केली आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.
प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे यांच्या हस्ते धार्मिक विधी व पूजा करण्यात आले.
उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्याचा सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याने यांचाही सत्कार आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. ठेव पावती वितरणही करण्यात आले.
याप्रसंगी सहकारत्न उत्तम पाटील, बाळाप्पा बेळकुड, बसगोंडा पाटील, बसवनाथ दासन्नवर, जयानंद हिप्परगी, शिवप्पा बेळकुड, घटप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अमोल नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, हनुमंत चिपळकट्टी, संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, चार्टर्ड अकाउंटंट सैदप्पा, विपुलराज वठारे, भरत गुंडे, यांच्यासह मुख्य शाखेचे संचालक, संकनकेरी येथील शेतकरी, व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
शाखाधिकारी राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.