निपाणी (वार्ता) : अनेक वर्षापासून रखडलेल्या ढोणेवाडी तलावाला अखेर उर्जित अवस्था मिळाली आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते, ग्राम पंचायत उपाध्यक्षा नंदिनी कांबळे व ग्राम पंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या तलाव कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी पहिल्या टप्प्यात दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
तलावाच्या दुरुस्तीकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले होते. परिणामी या तलावाला घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी सरली होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने उद्योग खात्री योजनेतून या तलाव कामाला चालना दिली. त्यामुळे ग्रामस्थातून समाधानाचे वातावरण पसरले आहे.
या निधीतून तलावा भोवतीचे गाजर गवत, तलावातील गाळ उपसून तलावाची खोली वाढवून सभोवती संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. याशिवाय पेव्हर ब्लॉक बसविणे, तलावाला दगडी पिचींग, वृक्षारोपण, आसन व्यवस्था करण्यात येणार आल्याचे अध्यक्षा गीतांजली माने यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्षा नंदिनी कांबळे, ग्राम पंचायत सदस्या संपदा जाधव, शिवाजी नागराळे, बाबासाहेब खोत, दादासो सुतार, कस्तुरी दुगाने, तायवा बारवाडे, सुरेखा पाटील, तुकाराम माळी, तानाजी जाधव, विजय माने, चिमासो नाडगे, संतोष हजारे, ग्रामविकास अधिकारी सुरज इंगळे, अभियंता अनिल बेडगी, सेक्रेटरी रवी चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.