निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोड वरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे आयोध्या मधील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणी सोहळ्या निमित्त श्रीराम यांच्या जीवनावरील नृत्य विविध ठिकाणी सादर करण्यात आले. मुलांना सामाजिक बांधीलकीची जाणीव करून देण्यासह त्यांच्यावर धार्मिक संस्कार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी राम जन्म, अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर, वनवास, सीता हरण, रावण वध, आयोध्यात पुनरागमन अशा महत्त्वाच्या टप्प्यावरील नाटिकांचे सादरीकरण केले. श्रीराम, लक्ष्मण, दशरथ, कैकयी, जनक राजा, सीता, ऋषी, रावण, अहिल्या हनुमान आणि वानरसेनेच्या भूमिका विद्यार्थ्यांनी वटविल्या होत्या.
प्राचार्या चेतना चौगुले आणि सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद सोलापूरकर यांच्यासह संस्थेचे संचालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.