आकाश माने ; मावळा ग्रुपतर्फे आयोजन
निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिवनेरी गडकोट मोहिमेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. यावर्षी प्रथमच गडकोट मोहिमेत महिला सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमिवर सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी दिली.
यावर्षी प्रथमच मावळा ग्रुपने मोहिमेत महिलांना सहभागी करून घेतले आहे. यामुळे या मोहिमेबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. ग्रुपने पहिल्या वर्षी किल्ले प्रतापगड, रायगड त्यानंतर किल्ले सज्जनगड व राजगड या मोहिमा केल्या आहेत. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर गडकोट मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेसाठी महिला व युवकांनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा घेत अनेक महिलांनी यामध्ये नोंदणी केली आहे.
युवकांची नोंदणी झाली असून शुक्रवारी (ता.२३) रात्री १० वाजता मोहिमेचे प्रस्थान होणार आहे. शनिवारी (ता.२४) सकाळी वडू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन केल्यानंतर लेण्याद्री येथे मोहीम पोहोचणार आहे. शनिवारी (ता.२५) सकाळी शिवनेरी गड दर्शन होणार आहे. मोहिमेत वीरूपाक्षलिंग समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांचा सहभाग आहे. मोहिमेसाठी उपाध्यक्ष महादेव चव्हाण, खजिनदार राहुल सडोलकर भाटले, ग्रामीण अध्यक्ष संतोष चव्हाण, शहराध्यक्ष अनिल चौगुले, सन्मेश जाधव, विनायक खवरे, संजय चिकोडे, उदय शिंदे, राहुल पाटील, हेमंत चव्हाण, महादेव बन्ने, विजय बुरुड, सुशांत कांबळे, शांतिनाथ मुद्कुडे, सागर खांबे यांच्यासह मावळा ग्रुपचे सदस्य परिश्रम घेत आहेत.