
निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामधील जग व पालखी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरास जाऊन आली. त्यानिमित्त येथील आमराई मध्ये रेणुका यात्रा भरली होती. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
रविवारी (ता.२५) सकाळी रेणुका मंदिरामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते रेणुका मातेला अभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर आमराई परिसरामध्ये सर्व मानाच्या जगांचे स्वागत झाले. दुपारी निपाणकर राजवाड्यामधून भाकरी भाजीचा नैवेद्य सवाद्य मिरवणूकीने आमराईमध्ये नेण्यात आला. यावेळी भाविकांनीही भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून देवीचे दर्शन घेतले.
सायंकाळी पाच वाजता भाविकांच्या उपस्थितीत ‘उद ग आई उदे, उदे’ जय घोषात श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते कापूर लावण्यात आला. निपाणकर घराण्यातील हडदलाही भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी सर्व जग व पालखी श्रीमंत सिद्धोजीराजे निपणकर यांच्या राजवाड्यात आल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर यात्रेची सांगता झाली.
यावेळी यात्रा कमिटी सदस्य श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत रमेश देसाई, प्रकाश मोहिते, श्रावण पवार रमेश बिरंजे, विनायक वडे, दीपक सांगावकर, जयराम मिरजकर, जयसिंग घोडके, वसंत मोरे संजीव तोरस्कार, धनंजय मोकाशी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta