
निपाणी (वार्ता) : शहर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्या पी. बी. रोडवरील श्रीराम मंदिर उडवून देणाऱ्या धमकीचे निनावी पत्र मंदिरात मिळाले आहे. याबाबत निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर यांनी दिली होती. त्यानुसार चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर निपाणीचे मंडळ पोलीस निरीक्षक बीएस तळवार व सहकाऱ्यांनी शनिवारी (ता.९) सायंकाळी राम मंदिरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
शतकोत्तर परंपरा असलेल्या निपाणीतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याजवळ निनावी पत्र आढळून आले. त्यानंतर हनुमान मंदिराजवळ दुसरे पत्र आढळून आले आहे. श्रीराम मंदिर ट्रस्टने दोन्हीही पत्रे निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार राम मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले असून मंदिराला चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गौडर आणि मंडळ पोलीस निरीक्षक तळवार यांनी परिसरात खबरदारीच्या सूचनाही दिल्या आहेत. निनावी पत्राबाबत पोलीस सतर्क झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतल्याचे गौडर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta