हंगाम लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत
कोगनोळी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच मजुर टंचाई, गावागावातील म्हाई, यात्रांचा हंगाम व वाढलेल्या उन्हाच्या झळा यामुळे ऊसतोडणी कमालीची रेंगाळली आहे. तोडणी लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत सापडले आहेत.
गेल्या काही वर्षात ऊसाखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत ऊसतोडणी मजुरांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे ऊस कारखान्यापर्यंत पोहोचविणे म्हणजे दिव्यच बनले आहे. ऊस पीक शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र ऊस तोडणीची बिदागी व तोडप्यांची सरबराई करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ऊस तोडणीचा दर प्रतिटन २०० रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागत आहेत. याशिवाय जेवण, नाश्ता, चहापाणी हा खर्च वेगळाच आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. ऊस तोडणीसाठी मजुरांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.
ऊसतोडणी लांबल्याने ऊसाच्या वजनात एकरी 6 ते 8 टनांची घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी किमान 20 हजार रुपयांचा फटका बसत आहे. साखर कारखान्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.