
कोगनोळी : 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कोगनोळी, आप्पाचीवाडी, मांगूर, बोरगाव, कोडणी आदी आंतरराज्य सीमेवर तपास नाके उभारले आहेत. यामध्ये पोलीस खाते, अबकारी खाते, महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासन आदींचा समावेश आहे.
तपासणी नाके मतदान होईपर्यंत म्हणजे 7 मेपर्यंत सुरु राहणार आहेत. तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
निवडणुक काळात रोख रक्कम, भेटवस्तू व मद्य यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. यावर आळा घालण्यासाठी प्रशासन तपासणी नाक्याच्या माध्यमातून करडी नजर ठेवून असते. निपाणी तालुका हा नजिकच्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होण्याची शक्यता असते. तसेच चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक सुरु असते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. तहसिलदार मुजफर बळीगार यांनी कोगनोळी तपास नाक्याला भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार पुढील काळात तपासणी नाक्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गावर नजर ठेवली आहे. डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष भरारी पथके कार्यान्वित झाली आहेत. लोकसभा निवडणुक घोषित झाल्यापासून प्रशासनातर्फे निवडणुक आचार संहितेची कडकपणे अंमलबजावणी केली जात आहे. तपासणी नाक्याच्या माध्यमातून गैरप्रकारावर नजर ठेवली आहे. अवैधपणे वाहतूक झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे तहसिलदार मुजफर बळीगार यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta