कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 14 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे.
गुरुवार तारीख 21 रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास साताराहून बेंगलोरकडे जात असलेली बस क्रमांक एन एल 01 बी 2787 गाडीची तपासणी केली असता यामध्ये 14 लाख रुपयाची रोकड असल्याचे निदर्शनास आले. टिंबर व्यावसायिक निसार सुन्नासबी (वय 55) राहणार मुगबाळ बेंगलोर असे पैसे घेऊन जाणारे व्यक्तीचे नाव आहे. सदर रकमेबद्दल कोणतेही प्रकारची कागदपत्रे सादर न केल्याने रक्कम जप्त करण्यात आली.
तपासणी नाका सुरू करून फक्त दोन चार दिवस झाले असता दुसऱ्यांदा रोकड सापडल्याने या सीमा तपासणी नाक्यावर गाड्यांची काटेकोरपणे तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाईमध्ये निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, एएसआय विजय पाटील, संजय काडगौडर, संदिप गाडीवड्डर, ग्राम विकास अधिकारी माळाप्पा दत्तवाडे, सेक्रेटरी शिवानंद तेली, लिपिक शिवलिंग दिवटे, विजय साळुंखे, बाळू हजारे, उमेश पाणीगट्टी यांच्यासह महसूल विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.