संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील; गोव्यातही शाखा विस्तारणार
निपाणी (वार्ता) : नफा मिळविण्याचा उद्दिष्ट बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकरी, उद्योजकांना मदत करण्याच्या दृष्टीने अरिहंत संस्थेची स्थापना केली आहे. ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्यामुळे अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेत चालू आर्थिक वर्षात १२०२ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. गतवर्षी संस्थेने ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण झाले असून गोवा राज्यातही शाखा विस्तारणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी दिली. बुधवारी (ता.२४) सकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रावसाहेब पाटील म्हणाले, संस्थेने ९९८ कोटी ३० लाखांवर कर्ज वाटप केले आहे. आर्थिक वर्षात ११ कोटी ५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहकांचे सहकार्य व विश्वासामुळे आर्थिक टंचाईच्या काळातही संस्थेने उलाढालीची घोडदौड सुरू ठेवली आहे. संस्थेच्या आणखी २४ शाखा विस्तारासाठी सौहार्द फेडरेशनकडे मागणी केली आहे. त्याला परवानगी मिळाल्यानंतर या शाखा होणार आहेत.
संस्थेत १३९७४ सभासद,५ कोटी ७८ लाखाचे भाग भांडवल, ५ कोटी २१६ कोटी १० लाखांची गुंतवणूक, १२०२ कोटी २५ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सभासद व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध कर्ज, ठेव योजना सुरू असेल गरजूंना वेळेत कर्ज पुरवठा केला आहे. त्यामुळे संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी, सध्या सहकारी संस्थांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. संस्था चालविणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीतही ‘अरिहंत’ संस्थेने योग्य नियोजन केल्याने आर्थिक प्रगती साधल्याचे सांगितले.
बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, शिवानंद राजमाने, अभयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, शरदकुमार लडगे, पीरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे, निर्मला बल्लोळे, अनिता मगदूम, अजित कांबळे, प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहायक व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे, प्रकाश जांगटे उपस्थित होते.