निपाणी (वार्ता) : कसबा सांगाव येथील संतोष पांडुरंग चव्हाण यांच्या विवाह सोहळ्यात मतदार शिक्षण, मतदार जनजागृती आणि मतदार साक्षरतेसह १०० टक्के मतदान होण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व वऱ्हाडी मंडळींना शंभर टक्के मतदान करणे विषयीची शपथ घेतली. लोकशाहीसाठी शपथ घेण्याच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाने स्वीप प्रकल्प तयार केला आहे. मतदार शिक्षण, मतदार जनजागृती आणि मतदार साक्षरतेसह १०० टक्के मतदान होण्यासाठी सर्व मतदारांनी ऑनलाइन शपथ, शाळा स्तरावरती प्रतिज्ञा, रांगोळ्या, बॅनरसह प्रभात फेऱ्या, गृहभेटीचे आयोजन केले होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळ्यात मतदारांना शपथ देणे, हा एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला. अधिकारी पदाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची चुणूक गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी दाखवून दिली.