कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर मोटरसायकल व बस अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 3 रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली.
संजय शंकर पाटील (वय 43) रा. आत्ताळ ता. गडहिंग्लज असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब केशव पाटील (वय 66) रा. कोगनोळी हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कोल्हापूरहून निपाणीकडे जात असलेली बस कोगनोळी फाट्यावर आली असता कोगनोळीतून कागलकडे जात असलेल्या बाळासाहेब पाटील व संजय पाटील यांच्या मोटरसायकलची धडक झाली.
यामध्ये बाळासाहेब पाटील गंभीर जखमी झाले तर संजय पाटील जागीच ठार झाले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनीकंट पुजारी, एस ए काडगौडर, पोलीस तळवार, ए एस आय कंबर यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
महामार्ग मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
——————————————————————-
राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून कोगनोळी फाट्यावरील येण्या- जाण्याचा मार्ग बंद करून मधूनच रस्ता काढून दिला आहे. त्याचबरोबर सेवा रस्त्याचे खोदकाम केले आहे. अत्यंत लहान व ये जा करण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने हा अपघात झाला असल्याची चर्चा उपस्थित ग्रामस्थातून होत होती. रस्ता रुंदीकरणाची काम सुरू असून फाट्यावरती गतिरोधक किंवा लाईट व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या ठिकाणाहून जाणे येणे नागरिकांना अवघड झाले आहे. यासाठी रस्ता रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी गतिरोधक बसवून लाईट व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.