ॲड. अविनाश कट्टी; ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची बैठक
निपाणी (वार्ता) : देशात भाजपा सत्तेवर आल्यास भारतीय घटना बदलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि ओबीसीवर अन्याय होणार आहे. शिवाय भारतीय लोकशाही आणि घटना धोक्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून भाजपला रोखले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे (खोब्रागडे) अध्यक्ष ॲड. अविनाश कट्टी यांनी केले.
निपाणी तालुका कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी या पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला.
ॲड. कट्टी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटना नको आहे. त्यामुळे संविधान बदलाचा घाट हाणून पडला पाहिजे. समाजातील काहींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
कर्नाटक राज्य जनरल सेक्रेटरी राजकुमार मेस्त्री यांनी, उमेदवाराचा पक्ष आणि जातीचा विचार न करता काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आठ वर्षापूर्वी भाजपने विकासाची स्वप्न दाखवून सत्ता निर्माण केली. तेच आता हुकुमशहा बनत आहेत. भाजपमुळे उद्योगधंदे नोकऱ्या जाऊन महागाई वाढली आहे. त्यामुळे समाज सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला हद्दपार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रा. शरद कांबळे यांनी, संविधानामुळे देशवासीयांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष किरण कांबळे, प्रा. एन. डी. जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय कांबळे यांनी आभार मानले.