नागरिकांतून उपस्थित होतोय सवाल
कोगनोळी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर नेमण्यात आलेली विविध खात्याची स्थिर पथके लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर हटविण्यात आली. मात्र निवडणुक काळात बॅरिकेडस लावून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. अद्यापही बंद असलेल्या आरटीओ चेक पोस्ट नाक्यामधूनच वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. वाहनांसाठी महामार्ग सुरु कधी होणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
लोकसभा आचारसंहितेत संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याकरिता कागल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आणि सध्या बंद असलेल्या आरटीओ चेक पोस्ट नाक्यामधून वाहने सुरु करण्यात आली. या ठिकाणी पोलीस, महसूल, जीएसटी, उत्पादन शुल्क अशा विविध विभागाच्या पथकांची नेमणूक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेचच या पथकांचे कामकाज थांबविण्यात आले. त्यानंतर बंद असलेल्या याच आरटीओ चेक पोस्ट नाक्यामधून वाहनांची वाहतूक अद्यापही सुरु आहे. तपासणी पथके बंद झाल्यानंतर महामार्गाची वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही बॅरिकेडस लावून बंद केलेला महामार्ग सुरु करण्यात आला नाही.