Friday , October 18 2024
Breaking News

शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी गायकवाडी खण उपयुक्त

Spread the love

 

माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष संघाकडून पाहणी : पालकमंत्र्याकडून हिरवा कंदी

निपाणी (वार्ता) : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणी पुरवठ्यासाठी मुबलक पाणी साठ्याची गरज आहे. हा साठा तलावातील पाणी संपल्यानंतर वापरता येणे गरजेचे आहे. त्यामुळे तो पाणीसाठी करण्यासाठी कोडणी-गायकवाडी हद्दीतील गायरान जागेत असलेल्या १६ एकरातील खणीतून करता येवू शकतो. त्यासाठी पालकमंत्री सतीश जारकिहोळी व जिल्हा प्रशासनाने कोडणी गायरान हद्दीतील खणीच्या पाण्याचा वापर निपाणी शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केला आहे. सोमवारी (ता.२७) काँग्रेसच्या आजी-माजी पदा‌धिकाऱ्याांनी या खणीला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर वरील माहिती देण्यात आली.
माजी नगराध्यक्ष प्रविण भाटले -सडोलकर म्हणाले, शहरातील पाणी टंचाईवर अनेक उपाय केले जात असताना हा खणीचा उपाय कमी खर्चीक आणि पाणी साठा करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. ही जागा शासनाची असून बाजूला असलेली शेत जमीनही खडकाळ आहे. त्या शेतकयांना मोबद‌ला दिल्यास तीही वापरता येणार आहे. कोडणी गावरान हद्दीत सर्व्हे नं. २६९ मध्ये अंदाजे १६ एकर जमीन आहे. शेजारीच महाराष्ट्र हद्दीत सर्वे नं. ४११ ते ४२० पर्यंत ३० एकर तर सोबतच्या २६७ आणि २७० सर्वे नं. मधील २१ एकर असा ७० एकराचा परिसर पाणी साठ्यासाठी वापरता येतो. खणीपासून १.५ कि. मी. अंतररावर निपाणी तलाव असल्याने हे पाणी तलावात सोडून परत जल शुद्धीकरण घटकात न घेता थेट घेता येणार आहे. त्यामुळे अनेक बाबीतून खर्च वाचणारु ही योजना आहे. खणीची उंची ५० फुटापर्यंत ठेवून जरी गायरान जागा वापरली तर १२० करोड लिटर पाणीसाठा होवू शकतो. या ठिकाणी जीवंत पाण्याचा झरा असल्याने नैसर्गिक स्त्रोत वापरता येणार आहे.
अर्जुनी, गायकवाडी भागातील वाहून जाणारे पाणी नैसर्गिक पध्दतीने या खणीमध्य साठले जाते. त्यामुळे या पाण्याचा पूर्ण वापर करून घेता येणार आहे. १६ एकरात असलेल्या खणीला खुदाई करणे गरजेचे आहे. ही खुदाई करताना रस्ते निर्माण करणा-या कंपनीस दिल्यास खुदाई खर्च वाचून तलाव रूंदीकरण व खोली वाढविता येणार आहे. त्यामुळे नवीन तलाव निर्माती अथवा नदीपासून पाईपलाईन या खर्चीक योजनपेक्षा ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे सडोलकर यांनी सांगितले.
माजी आमदार काकासाहेब पाटील व नेतेमंडळीच्या माध्यामातून ही योजना पूर्ण करून निपाणीची पाणी टंचाई दूर करता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, गजेंद्रपोळ, माजी उपनगराध्यक्ष इम्तियाज काझी, माजी सभापती किरण कोकरे, बबन घाटगे, विश्वास पाटील, अल्लाबक्ष बागवान, नगरसेवक रवी श्रीखंडे, माजी नगरसेवक दिलीप जाधव, सुभाष कांबळे, शशिकांत चडचाळे, मुकुंद रावण, रियाज बागवान, संदीप चावरेकर, सामाजिक कार्यकर्ते युवराज पोळ, बबन चौगुले, किसन दावणे, प्रकाश पोटजाळे, शरीफ बेपारी, सुरेश गाडीवड्डर यांच्यासह माजी नगरसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————————–
पालकमंत्र्यांकडून सर्वेच्या सूचना
नव्या पाणी योजनेबाबत माजी नगराध्यक्ष प्रविण सडोलकर यांनी पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्र्यानी लघु पाटबंधारे खात्याला पत्र पाठवून सदर योजनेचा सर्व्हे करण्याच्या सुचना केल्या आहेत. यामध्ये त्यांनी निपाणी हे जिल्ह्यातील दुसरे मोठ शहर व तालुका केंद्र आहे. शहरी भागातील लोकांना अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सर्वे करून आहवाल देण्याच्या सुचना केल्या आहेत. याबाबतचे पत्र प्रविण भाटले-सडोलकर यांनाही पाठविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *