निपाणी (वार्ता) : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता.४) जाहीर झाला. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी दूरचित्रवाणी आणि प्रसार माध्यमावर निकाल पाहत घरीच बसल्याने सकाळी रस्त्यावर शुकशुकाट होता. दुपारी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर येथील काँग्रेस कार्यालयासह चौका चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
भाजपतर्फे अण्णासाहेब जोल्ले तर काँग्रेसतर्फे प्रियांका सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढवली. दोन्ही पक्षाचे उमेदवार तुल्यबळ असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती.
पहिला फेरीपासूनच जारकीहोळी या पुढे असल्याने दुपारी साडेअकरा वाजल्यापासूनच शहरात सह ग्रामीण भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यास सुरुवात केली होती. येथील काँग्रेस कार्यालयासमोर दुपारी बारा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी जमत होती. तर काही कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर नृत्य करीत आनंदोत्सव साजरा केला. काहीतरी दुचाकीवरून रॅली काढून जल्लोष केला. तर उघड्या जीपला पक्षाचे झेंडे लावून शहरातून मिरवणुका काढल्या. यावेळी भर उन्हातही कार्यकर्त्यांची चौका चौकात गर्दी झाली होती. शहरात शांतता आणि सौहार्दतेचे वातावरण राहण्यासाठी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस.तळवार यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला होता. शिवाय येथील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौकासह महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.
प्रत्येक फेरीचे निकाल मोबाईलवर अपडेट येत होते. त्यामुळे निकाल होईपर्यंत प्रत्येकांचे डोळे मोबाईल आणि दूरचित्रवाणीवर खिळून राहिले होते. एकंदरीत शहरासह ग्रामीण भागात निकालापर्यंत शांततेचे वातावरण दिसत होते.
——————————————————————-
उत्तम पाटील यांच्या कार्यालयासमोर आनंदोत्सव
लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे सहकार्य उत्तम पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा व्यक्त केला होता. त्यामुळे जारकीहोळी यांच्या विजयानंतर सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.